माधवा गणित स्पर्धा

29 Jan 2023 15:52:35
माधवा गणित स्पर्धा
 
गणित ओलंपियाड सारखी आव्हानात्मक स्पर्धा विद्यार्थी बारावीपर्यंतच देऊ शकतात. अशी स्पर्धा पदवी पातळीवरील विद्यार्थ्यांसाठी असावी अशा प्रेरणेमधून स. प. महाविद्यालयाच्या गणित विभागाचे प्रमुख डॉ. वि. मा. सोलापूरकर यांनी माधवा स्पर्धेची संकल्पना २००९ मध्ये मांडली. या स्पर्धेसाठी भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ अॅटॉमिक एनर्जी (DAE) कडून नॅशनल बोर्ड ऑफ हायर मॅथेमॅटिक्स (NBHM) च्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध झाले. चौदाव्या शतकातील केरळ मधील गणितज्ञ माधवा यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या स्पर्धेला माधवा गणित स्पर्धा असे नाव देण्यात आले.
 
जानेवारी २०१० मध्ये ही स्पर्धा केवळ पुणे आणि मुंबई या दोन शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर आयोजित केली होती. हळूहळू या स्पर्धेचा विस्तार संपूर्ण भारतभर होऊ लागला हजारो विद्यार्थी यात भाग घेऊ लागले. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांबरोबर काही निवडक विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली केली जाणारी राष्ट्रीय पातळीवरील शिबिरे यात विद्यार्थ्यांना भारतातील विविध गणित तज्ञांबरोबर चर्चा करण्याची संधी मिळते. विविध प्रकारची गणिते सोडवण्याचा सराव होतो. गणिताची आवड वाढते.
 
जागतिक महामारीच्या काळात २०२१ आणि २०२२ मध्ये ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली यावर्षी २८ जानेवारी २०२३ रोजी माधवा गणित स्पर्धा भारतामध्ये २१ ठिकाणी आयोजित केली होती. यावर्षी ईशान्य भारतामधून सुद्धा या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. संपूर्ण भारतामधून साधारण ६००० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. डॉ. वि. मा. सोलापूरकर हे या स्पर्धेचे राष्ट्रीय समन्वयक आहेत. माधवा गणित स्पर्धेसाठी डॉ. गीतांजली फाटक, प्रा. गहिनीनाथ सोनवणे व गणित विभागातील सर्व सहकारी यांचे साह्य नेहमीच असते. ही स्पर्धा महाविद्यालयाचा गणित विभाग आणि होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गेली १४ वर्ष यशस्वीपणे आयोजित केली जाते. यापुढे ही स्पर्धा भारतातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आयोजकांचा प्रयत्न राहील.
 
Mathematics exam
Mathematics exam 
Powered By Sangraha 9.0