शिक्षण प्रसारक मंडळीच्या नवीन व आधुनिक शैक्षणिक वास्तूचे उद्घाटन व नामकरण सोहळा उत्साहात संपन्न

शिक्षण प्रसारक मंडळी    19-Aug-2026
Total Views |
शिक्षण प्रसारक मंडळीच्या प्रदीर्घ आणि गौरवशाली शैक्षणिक वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून मंडळीच्या नवीन व आधुनिक शैक्षणिक वास्तूचा उद्घाटन व नामकरण सोहळा आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
 
विद्यार्थ्यांना आधुनिक, गुणवत्तापूर्ण, तंत्रज्ञानस्नेही आणि सर्वांगीण शिक्षणासाठी अधिक सक्षम व समृद्ध वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही आधुनिक शैक्षणिक वास्तू विकसित करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन व्यवस्थापन शिक्षण, कौशल्यविकास, आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, नवोपक्रम आणि भारतीय ज्ञान प्रणाली यांचा समन्वय साधणारे विविध उपक्रम या वास्तूमधून राबविण्याचे नियोजन आहे.
 
शिक्षण प्रसारक मंडळीच्या नवीन वास्तूचे कोनशिला अनावरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व महाराष्ट्र राज्याचे माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुरेश उपाख्य भैयाजी जोशी यांचे शुभहस्ते वास्तूचे नामकरण करण्यात आले.
 
sp-mdandali-1
sp-mdandali-2
 
महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रसंगी एक सविस्तर व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा व्यक्त केल्या. आपल्या संदेशातून त्यांनी सर्व सहभागी मान्यवरांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि शिक्षण प्रसारक मंडळीच्या विकास व प्रगतीसाठी हा उपक्रम यशस्वी व मोलाचा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चे क्रियान्वयन शिक्षण प्रसारक मंडळी अधिक प्रभावीपणे करेल व भारतीय ज्ञान परंपरा राबविण्यात पण पुढाकार घेईल असा विश्वास व्यक्त केला.
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष सुधीर काळकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळीच्या प्रदीर्घ शैक्षणिक परंपरेचा उल्लेख करताना, बदलत्या काळानुसार आधुनिक शिक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन वास्तूची उभारणी करण्यात आल्याचे सांगितले. परंपरा, आधुनिकता आणि भविष्यातील शैक्षणिक गरजा यांचा समन्वय साधत विद्यार्थ्यांना अधिक सक्षम करण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. या नवीन वास्तूमध्ये व्यवस्थापन शिक्षण, कौशल्यविकास आणि आधुनिक तंत्रज्ञान यांना विशेष महत्त्व दिले जाणार आहे. AI, आधुनिक तंत्रज्ञान आणि भारतीय ज्ञान प्रणाली (IKS) यांचा समन्वय साधून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, नवोन्मेषी विचार, व्यवस्थापन कौशल्ये आणि उद्योगाभिमुख क्षमता विकसित करण्याच्या दिशेने ही वास्तू महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
कार्यक्रमात शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ॲड. सदानंद फडके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी शिक्षणाकडे केवळ पदवी किंवा रोजगार मिळविण्याचे साधन म्हणून न पाहता, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे आणि राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी माध्यम म्हणून पाहण्याची गरज व्यक्त केली. बदलत्या काळातील तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नव्या कौशल्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी आधुनिक ज्ञान आत्मसात करताना भारतीय मूल्ये, संस्कार आणि ज्ञानपरंपरेशी आपली नाळ कायम ठेवावी, असे त्यांनी सांगितले. वास्तूच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच कौशल्य, नेतृत्व, नवोन्मेष आणि सामाजिक जाणीव विकसित करण्याच्या संधी मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या संधी शोधणारे न राहता नवीन संधी निर्माण करणारे, समाजाच्या गरजा ओळखून त्यावर उपाय शोधणारे आणि देशाच्या विकासात योगदान देणारे सक्षम नागरिक बनावे, असे आवाहनही त्यांनी केले.
 
sp-mdandali-3
sp-mdandali-4
 
प्रमुख पाहुणे मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे –
 
श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी मातृभाषेतून शिक्षणाचे महत्व विषद केले. त्या अनुषंगाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये संस्कार व अनुशासन यावर आधारित मूल्याधारित शिक्षणाचा पाठपुरावा केला. तसेच भारतीय ज्ञान परंपरेचा वारसा अधोरेखित करून संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मा. भैयाजी जोशी यांच्या मनोगतातील प्रमुख मुद्दे -
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य श्री. सुरेशजी उपाख्य भैयाजी जोशी यांनी संस्थेने जपलेल्या शैक्षणिक नीतीमूल्यांच्या आठवणींना उजाळा देत औद्योगिक जगतातील गरजांच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना अधिकाधिक सक्षम बनविण्यासाठी अधिक ठोस पावले उचलावीत असे मत व्यक्त केले. या प्रसंगी मान्यवरांनी शिक्षण प्रसारक मंडळीच्या प्रदीर्घ शैक्षणिक परंपरेचा गौरव करताना संस्थेने बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याचे कौतुक केले. आधुनिक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील संधींसाठी सक्षम करण्याच्या गरजेवर यावेळी भर देण्यात आला.
 
या कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळीच्या माजी नियामक मंडळ सदस्यांची, विद्यमान व माजी पदाधिकाऱ्यांची, विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी व मान्यवर राजकीय व्यक्तींची, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध स्तरांवरील पदाधिकाऱ्यांची, शिक्षणतज्ज्ञांची, अकादमिक क्षेत्रातील मान्यवरांची, सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींची तसेच संस्थेशी संबंधित विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
 
याशिवाय शिक्षण प्रसारक मंडळीचे उपाध्यक्ष, नियामक मंडळाचे सदस्य, सचिव, विविध संस्थांचे प्रमुख, प्राचार्य, शिक्षक व प्राध्यापक, कर्मचारी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शि प्र. मंडळीच्या नियामक मंडळाचे सदस्य श्री पराग ठाकूर व आभारप्रदर्शन संस्थेचा सचिव श्रीमती रमा कुलकर्णी यांनी केले.